पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीला धक्का? मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत चलबिचल; मंगेश चिवटेंचा मोठा दावा
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
भाजपकडून कौस्तुभ गावडे यांचे नाव चर्चेत
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी भाजपचे पारडे या मतदारसंघात जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मंगेश चिवटेंचीही जोरदार तयारी
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी गेल्या काही काळापासून तयारी करणारे मंगेश चिवटे यांनी आपल्या उमेदवारीबाबत मोठा दावा केला आहे. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गेल्या दोन वर्षांपासून आपण सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जुनी पेन्शन योजना, प्रचलित टप्पावाढ, शिक्षकांसाठी आरोग्य विमा कवच तसेच शाळास्तरावरील आणि वैयक्तिक मान्यतेशी संबंधित प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा केल्याचा दावा चिवटे यांनी केला.
‘शिक्षकांच्या माध्यमातूनच माझी उमेदवारी पुढे आली’
आपली उमेदवारी ही शिक्षकांच्या माध्यमातूनच पुढे आली असून, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केल्यामुळे शिक्षकांचा विश्वास आपल्या पाठीशी असल्याचे मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण गंभीरपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘महायुतीचे गणित बदलले तरी निवडणूक लढवणार’
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निवडणुकीची तयारी करत असल्याचे चिवटे यांनी सांगितले. महायुतीच्या जागावाटपात काही वेगळे राजकीय गणित झाले तरी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या समन्वय समितीच्या निर्णयाकडे लक्ष
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘शिक्षकांच्या आशीर्वादाने विजय निश्चित’
“तमाम शिक्षकांच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपचे संभाव्य उमेदवार कौस्तुभ गावडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून तयारी करणारे मंगेश चिवटे यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता महायुतीकडून अंतिम उमेदवार कोण? याकडे शिक्षकांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




