जिल्हा बँकपंढरपूरमहाराष्ट्र राजकारणराजकीय विश्लेषणसोलापूरस्थानिक बातमी

DCC बँक चेअरमनपदाची चर्चा रंगली! दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार? प्रशांत परिचारकांना मिळणार संधी की मुख्यमंत्री फडणवीस देणार धक्का?

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदाच्या लढतीबरोबरच आता चेअरमनपद कोणाकडे जाणार, याची चर्चा रंगू लागली आहे. प्रशांत परिचारक समर्थकांकडून गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी प्रतीक्षा केल्याचा मुद्दा मांडला जात आहे. त्यामुळे यंदा परिचारकांना चेअरमनपदाची संधी मिळणार का, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

चेअरमन निवडीचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे!

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चेअरमन निवडीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले,

“अजून बँकेची निवडणूक संपायची आहे. निवडणूक झाल्यानंतर चेअरमन निवडीचा अधिकार आमच्या स्थानिक पातळीवर नाही. चेअरमन निवडीचा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे. मुख्यमंत्री महोदय ज्यांची निवड करतील, ते चेअरमन म्हणून काम करतील.”

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या या विधानामुळे चेअरमनपदाचा निर्णय स्थानिक राजकीय नेत्यांच्या चर्चेपेक्षा मुख्यमंत्री स्तरावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकीय समीकरणे बदलणार? राजन पाटील, राजेंद्र राऊत यांच्या गटाचेही वजन!

या चर्चेला आणखी एक राजकीय संदर्भ आहे. राजन पाटील यांच्या कुटुंबातील दोन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. राजेंद्र राऊत यांच्या कुटुंबातीलही दोन संचालक बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे संचालक मंडळातील प्रमुख नेत्यांचे राजकीय वजन आणि चेअरमनपदासाठी होणारी संभाव्य रस्सीखेच याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशांत परिचारकांची दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार?

प्रशांत परिचारक हे देखील बिनविरोध संचालक झाले आहेत. परिचारक समर्थकांच्या मते, त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून या पदासाठी प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त होत आहे.

मात्र, स्वतः प्रशांत परिचारक यांनीही अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नसून पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी भूमिका मांडली आहे.

चेअरमनपदासाठी कोणाची वर्णी लागणार?

एकीकडे प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी यांसारख्या प्रमुख नेत्यांची संचालक मंडळातील उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

आता प्रश्न एकच… दहा वर्षांची प्रतीक्षा संपवून प्रशांत परिचारकांना चेअरमनपदाची संधी मिळणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्य नावावर शिक्कामोर्तब करणार?

याचे उत्तर बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दिनप्रभा प्रतिनिधी | सोलापूर
संपादक – डॉ. किरण दिनकर बोधले

Related Articles

Back to top button