
माढा | प्रतिनिधी अशोक शिंदे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशलवर्क कॉलेज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा – धाराशिव झोन २०२६-२७ मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर येथील विद्यार्थी कु. प्रणव उबाळे (B.Sc.-I) याने उल्लेखनीय कामगिरी करत ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा ३ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव येथे पार पडली. प्रणव उबाळे हा नवभारत विद्यालय, दारफळ येथील मैदानातून तयार झालेला खेळाडू असून त्याच्या या यशामुळे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर तसेच दारफळ-सिना गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रणवच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तसेच दारफळ ग्रामस्थांच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रणवच्या क्रीडा कारकिर्दीत त्याचे चुलते व तुळजाभवानी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाई विलास उबाळे सर, त्याचे बंधू भैय्यासाहेब विलास उबाळे तसेच सोमनाथ सुभाष उबाळे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
ग्रामीण भागातील मातीतून घडलेल्या प्रणवने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
दिनप्रभा न्यूज, माढा तालुका प्रतिनिधी – अशोक शिंदे, दारफळ(9766976263)




