DCC बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप! खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांचीच निवडणुकीतून माघार; मोहिते-पाटील गटाच्या रणनीतीबाबत चर्चांना उधाण!

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोमवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी कृषी पणन प्रक्रिया आणि दुग्ध विकास संस्था या दोन्ही मतदारसंघांतून दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आव्हान देणाऱ्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनीच माघार घेतल्याने या निर्णयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
रणजितसिंहांचा अर्ज अपात्र, त्यानंतर धैर्यशील यांची माघार!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्यानंतर मोहिते-पाटील गटाची पुढील भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यातच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दोन मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी त्यांनी दोन्ही अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
अनेक उमेदवारांची माघार
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह बाबुराव रामचंद्र गायकवाड यांनी कृषी पणन प्रक्रिया मतदारसंघातून, नानासाहेब पंढरीनाथ नाईकनवरे यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून, तर संग्रामसिंह जहागीरदार आणि सुभाषराव निंबाळकर यांनी माळशिरस सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
यापूर्वी सिद्धाराम चाकोते यांनी नागरी बँका मतदारसंघातून, तर विश्वेश्वर नागुर यांनी अक्कलकोट सोसायटी मतदारसंघातून माघार घेतली आहे.
केडर मतदारसंघात १४ उमेदवार; चुरस वाढणार!
दुसरीकडे केडर मतदारसंघात तब्बल १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या मतदारसंघातील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. यामध्ये दिलीप माने यांचे दोन अर्ज, सुरेश हसापुरे, श्रीदीप हसापुरे, धैर्यसिंह मोहिते-पाटील, सुरेश पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, नानासाहेब नाईकनवरे, नागनाथ रनशूर, देविदास ढोपे आणि धनाजी शिंगाडे यांचा समावेश आहे.
बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न की राजकीय डावपेच?
मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू असले, तरी विविध मतदारसंघांतील उमेदवारांची संख्या पाहता निवडणुकीतील चुरस कायम असल्याचे दिसत आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आव्हान देणाऱ्या खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीच माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या माघारीमागे नेमके कोणते राजकीय गणित आहे? मोहिते-पाटील गटाची पुढील रणनीती काय असणार? आणि या निर्णयामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात कोणता बदल होणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी | सोलापूर
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य, समाज, संस्कार




