महेश मालक इंगळे यांचा वाढदिवस वृक्षभेट व सामाजिक उपक्रमांनी साजरा; कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला सलग दुसऱ्यांदा NBA मानांकन!

दिनप्रभा अक्कलकोट प्रतिनिधी : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व देवस्थान संचलित कै. कल्याणराव बाळासाहेब इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन तथा नगरसेवक, भाजप नेते महेश मालक इंगळे यांचा वाढदिवस यंदा हार-तुरे आणि केक यांना फाटा देत वृक्षभेट व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांना वृक्षाचे रोपटे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला सलग दुसऱ्यांदा NBA मानांकन!
या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांच्याकडून कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाला सलग दुसऱ्यांदा NBA मानांकन प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेतील सातत्य, उत्कृष्ट शैक्षणिक कार्यपद्धती आणि संस्थेच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली ही मोठी पावती असून महाविद्यालयासाठी अभिमानाची व गौरवाची बाब ठरली आहे.
वाढदिवसापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य!
यावेळी मनोगत व्यक्त करताना महेश मालक इंगळे म्हणाले की, यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले. महाविद्यालयाकडून वृक्षाचे रोपटे भेट मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. हे रोपटे महाविद्यालयाच्या परिसरात लावून त्याचे योग्य जतन व संवर्धन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि जल-पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी राहावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथील नागरिकांनी वृक्षारोपण, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन!
सलग दुसऱ्यांदा NBA मानांकन मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशासनाचे महेश मालक इंगळे यांनी विशेष अभिनंदन केले. शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्य राखून संस्थेचा नावलौकिक वाढविणाऱ्या प्राचार्य नागनाथ जेऊरे व संपूर्ण शिक्षकवृंदाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन घुरघुरे सर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील उद्योगपती इंजतकर साहेब, उद्योगपती शिंदे साहेब, प्राचार्य एन.बी. जेऊरे, युवा भाजपा नेते प्रथमेश मालक इंगळे, महाविद्यालयाचे एच.ओ.डी. देसाई सर, जनगोंडा सर, गायकवाड सर, कोरशेट्टी सर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून वृक्षभेट, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांना दिलेले प्राधान्य तसेच महाविद्यालयाला मिळालेले सलग दुसऱ्या NBA मानांकनाचे यश यामुळे या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
दिनप्रभा प्रतिनिधी : श्री. चंद्रकांत डांगे, अक्कलकोट तालुका
खुलासा : या बातमीतील माहिती संबंधित प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या वृत्तावर आधारित आहे. काही तथ्यात्मक त्रुटी किंवा चुकीची माहिती आढळल्यास संबंधितांच्या अधिकृत माहितीनुसार दुरुस्ती करण्यात येईल.
ग्राफिक्स टीप : बातमीसोबत वापरण्यात आलेली AI निर्मित ग्राफिक्स ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत.




