सातारा जिल्हा बँकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात यश; राष्ट्रवादी-शिवसेनेचा सत्तेवर कब्जा!

उदयसिंह पाटील उंडाळकर अध्यक्षपदी, तर दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड; जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
सातारा : दिनप्रभा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला यश आले आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापनेचे गणित जुळवत बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची निवड केली आहे.
या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वाधिक संचालक निवडून आणूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागल्याने पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित भूमिका घेतल्याने भाजपचे सत्तास्थापनेचे गणित बिघडले. दोन्ही पक्षांच्या एकत्रित पाठबळावर बँकेतील सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती आली आहेत.
संचालकांच्या संख्याबळातून सत्तेचे नवे गणित
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात भाजपचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक आहेत. संख्याबळाच्या या समीकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती यशस्वी केली.
जिल्हा परिषद निवडीचा वचपा? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
या संपूर्ण राजकीय घडामोडीमागे सातारा जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेच्या वेळी घडलेल्या राजकीय हालचालींची पार्श्वभूमी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी झालेल्या राजकीय समीकरणांची परतफेड जिल्हा बँकेच्या सत्तावाटपातून करण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीमधील मित्रपक्षांनीच भाजपला बाजूला ठेवत स्वतंत्र सत्तेचे समीकरण उभे केल्याने साताऱ्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. या निवडीचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिनप्रभा न्यूज : सत्य, समाज, संस्कार!




