आरोग्यधार्मिकपंढरपूरस्थानिक प्रशासनस्थानिक बातमी

कार्तिकी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज! पंढरपुरात ५ ट्रॉमा-आयसीयू सेंटरसह व्यापक आरोग्य यंत्रणा तैनात

६५ एकर आणि वाळवंट परिसरातील आरोग्य केंद्रांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्याकडून पाहणी; १५ औषधोपचार केंद्रे, १२ रुग्णवाहिका आणि ३३ आरोग्यदूत वारकऱ्यांच्या सेवेत!

पंढरपूर | दिनप्रभा प्रतिनिधी

कार्तिकी यात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविक आणि वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. यात्रेदरम्यान भाविकांना तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभागाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.



या आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी पंढरपूर शहरातील ६५ एकर परिसर तसेच वाळवंट येथील औषधोपचार केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर जळगावकर महाराज उपस्थित होते.



पाहणीदरम्यान औषधोपचार केंद्रांमधील सुविधा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सुविधा आणि गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याबाबतच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अशी सज्ज आहे आरोग्य यंत्रणा!

कार्तिकी वारीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढीलप्रमाणे व्यवस्था केली आहे.

१. ५ ट्रॉमा व आयसीयू सेंटर – आपत्कालीन आणि अतिदक्षता उपचारांसाठी.

२. १५ औषधोपचार केंद्रे – प्राथमिक तपासणी व औषधोपचारासाठी.

३. ६ रुग्णवाहिका (१०८) – आपत्कालीन रुग्णसेवेसाठी.

४. ६ रुग्णवाहिका (१०२) – आरोग्य सेवेसाठी.

५. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय – रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज.

६. २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे – आरोग्य सेवा उपलब्ध.

७. ३ आपला दवाखाना केंद्रे – प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी.

८. ७ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे – आरोग्य सेवा पुरविण्यासाठी.

९. नगरपालिका आरोग्य विभाग – स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी.

१०. हिवताप कार्यालय – कीटकजन्य आजारांचे नियंत्रण व सर्वेक्षण.

११. ३३ आरोग्यदूत – वारकऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व प्राथमिक मदतीसाठी.

आरोग्य पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना

यात्रेच्या काळात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखणे, स्वच्छतेबाबत दक्षता घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित आरोग्य पथकांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे, रुग्णसेवा अखंडित ठेवणे आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

वारकऱ्यांची सुरक्षितता, आरोग्याची काळजी आणि तत्पर वैद्यकीय सेवा हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक आरोग्य विभाग कार्तिकी वारीसाठी सज्ज झाला आहे.


दिनप्रभा न्यूज पोर्टल | सत्य, समाज, संस्कार

Related Articles

Back to top button