अक्कलकोटमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा मोठा छापा! स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त

अक्कलकोट प्रतिनिधी श्री. चंद्रकांत डांगे
महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर परिसरातील प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानावर अचानक छापा टाकत प्रशासनाने तब्बल ८५० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. या कारवाईमुळे प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
श्री क्षेत्र अक्कलकोट हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होत असतात. दर्शनानंतर अनेक भाविक मंदिर परिसरातील दुकानांतून प्रसाद आणि मिठाई खरेदी करतात.
मात्र, याच प्रसाद विक्रीच्या दुकानांमध्ये भेसळयुक्त मिठाई विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक तपासणी मोहीम राबवत संबंधित दुकानावर कारवाई केली. यावेळी सुमारे ८५० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली.
या धडक कारवाईमुळे अक्कलकोटमधील प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले असून, भाविकांना विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन निकृष्ट किंवा भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तीर्थक्षेत्रातील प्रसाद विक्रीच्या दुकानांची नियमित तपासणी करण्याची गरजही या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
दिनप्रभा अक्कलकोट प्रतिनिधी श्री. चंद्रकांत डांगे




