DCC बँक निवडणुकीत न्यायालयीन लढाई पेटली! मोहिते-पाटील कोणती रणनीती आखणार? सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण

सोलापूर | दिनप्रभा न्यूज
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता केवळ मतदानापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती न्यायालयीन आणि राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनू लागली आहे. आठ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. विभागीय सहनिबंधकांनी अपील फेटाळल्यानंतर सात नेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण घडामोडीत मोहिते-पाटील गटाची भूमिका विशेष चर्चेत आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न आणि जिल्हा बँकेतील बदलती राजकीय समीकरणे पाहता मोहिते-पाटील नेमकी कोणती रणनीती आखणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यायालयीन लढाई पुढे नेत उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होणार की समर्थकांच्या माध्यमातून बँकेतील राजकीय ताकद टिकवण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
दुसरीकडे, प्रशांत परिचारक यांना विभागीय सहनिबंधकांकडून दिलासा मिळाला आहे. तर संजय शिंदे, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव अवताडे आणि सुरेश हसापुरे यांच्यासह सात नेत्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दिवाळीच्या सुट्टीतही सुनावणी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
एकीकडे न्यायालयीन लढाई, दुसरीकडे संचालकपदासाठी राजकीय जुळवाजुळव आणि तिसरीकडे अध्यक्षपदाच्या खुर्चीचे गणित अशा तिहेरी संघर्षात जिल्हा बँकेची निवडणूक अडकली आहे.
मोहिते-पाटील गट पुढे कोणते पाऊल उचलणार? न्यायालयीन निकालानंतर जिल्हा बँकेच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार का? या प्रश्नांची उत्तरे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता न्यायालयीन निर्णयाकडे लागले आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी | सोलापूर




