भोसे येथे कृषिराज शुगरच्या रोलर पूजनाचा उत्साहात सोहळा; १ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा कारखाना हंगामासाठी सज्ज!

भोसे, ता. पंढरपूर | दि. १० नोव्हेंबर २०२६
शेतकऱ्यांना वेळेवर ऊसतोड, वाहतूक आणि पेमेंट देण्याची चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांची ग्वाही!
पंढरपूर तालुक्यातील भोसे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राजवी ॲग्रो पावर प्रायव्हेट लिमिटेड, आलेगाव संचलित कृषिराज शुगर, राजवी युनिट नं. २, भोसे या साखर कारखान्याचा रोलर पूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमामुळे आगामी गळीत हंगामाच्या तयारीला वेग आला असून, कारखाना लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, भैरवनाथ शुगर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मार्गदर्शक तथा राजवी ॲग्रो पावर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत सर आणि व्हाईस चेअरमन तथा सोलापूर जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या शुभहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी संचालक ऋतुराज मामा सावंत आणि युवा नेते गणेश दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
१ हजार मेट्रिक टन गाळप क्षमता; गळीत हंगामासाठी यंत्रणा सज्ज!
भोसे व परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हा कारखाना सुरू करण्यात येत आहे. प्रतिदिन १ हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता असलेला हा कारखाना गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये लवकरच सुरू होणार आहे. कारखान्यातील मशिनरीची देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणादेखील सज्ज करण्यात आली आहे.
वेळेवर ऊसतोड, वाहतूक आणि पेमेंट हेच आमचे वचन – प्रा. शिवाजीराव सावंत
यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की, भोसे व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषिराज शुगरचे युनिट सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणणे, वेळेवर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करणे, याला आमचे प्राधान्य राहणार आहे. सर्व शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आगामी गळीत हंगाम यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भैरवनाथ शुगर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अनिल दादा सावंत आणि पंढरपूर तालुक्याचे युवा नेते गणेश दादा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांसह शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती
या सोहळ्यास भोसे गावचे सरपंच ॲड. गणेश दादा पाटील, उंदरगावचे सरपंच राजाभाऊ लवटे, आशिष दादा पाटील, शिवसेना नेते भगवान दादा जमदाडे, जनहित शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भाऊ जमदाडे, प्रगतशील शेतकरी धर्मजय तळेकर, बाळासाहेब गावडे, नितीन कोरके, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार नागेश मिसाळ, प्रशांत होळकर, महादेव शिंदे, अनंता नरसाळे, सागर माने, अरविंद खरात, अजिंक्य काटे, स्वप्निल खरात, संदीप सावंत, आकाश नागटिळक, अमोल कोकाटे, तानाजी भाऊ सावंत, भजनदास नाना खटके, अशोक खटके आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच वर्क्स मॅनेजर शकील शेख, चीफ केमिस्ट औदुंबर टरले, मुख्य शेती अधिकारी सचिन भुसारे, अकाउंटंट विष्णू देवकळे यांच्यासह भोसे व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवी ॲग्रो पावर प्रायव्हेट लिमिटेड, आलेगावचे जनरल मॅनेजर (ॲग्री) राजाभाऊ खटके यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दादासाहेब तळेकर यांनी केले.
भोसे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर गाळपाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने आगामी हंगामात या कारखान्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता कारखाना प्रत्यक्ष सुरू होऊन शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने कितपत पूर्ण होतात, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी | पंढरपूर
वेबसाईट: www.dinprabhanews.in
ई-मेल: dinprabhanews@gmail.com
मुख्य संपादक : श्री. डॉ. किरण दिनकर बोधले



