दिनप्रभा न्यूजचे माढा तालुका प्रमुख अशोक शिंदे यांच्या पुढाकारातून दारफळ येथे रेडिओ मित्र मेळावा उत्साहात संपन्न!

महाराष्ट्रासह परराज्यातील रेडिओप्रेमींची मांदियाळी; दिवाळीनिमित्त मैत्री, माणुसकी आणि आपुलकीचा अनोखा सोहळा!
माढा : दिवाळी सणाचे औचित्य साधून दिनप्रभा न्यूजचे माढा तालुका प्रमुख श्री. अशोक शिंदे यांच्या पुढाकारातून दारफळ येथे भव्य रेडिओ मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विविध भागांतून आलेल्या रेडिओप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
रेडिओच्या माध्यमातून एकमेकांशी जुळलेली मैत्री अधिक दृढ व्हावी, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होता यावे, तसेच गरजेच्या वेळी परस्परांना मदतीचा हात देता यावा, या सामाजिक आणि आपुलकीच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रासह परराज्यांतून आलेल्या रेडिओ मित्रांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. दिवाळीच्या आनंदात जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी आपले अनुभव, विचार आणि भावना एकमेकांसोबत व्यक्त केल्या.

यावेळी तेरणा रेडिओचे लोकप्रिय निवेदक रमेश पेठे सर यांनी उपस्थित रेडिओ श्रोत्यांना मार्गदर्शन केले. रेडिओच्या माध्यमातून निर्माण होणारी मैत्री, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
तसेच सुपरहिटचे मालक कौसर पठाण यांनी रेडिओ आणि प्रत्यक्ष जीवनातील सुख-दुःखाच्या प्रसंगी एकमेकांना कशा प्रकारे साथ देता येईल, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तेरणा रेडिओवर आपल्या सुमधुर आवाजाने लोकप्रिय झालेल्या ‘आवाजाच्या कोकिळा’ प्रगती मॅडम यांनी महिला भगिनींसह उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधत विचारांचे आदानप्रदान केले.
या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रेडिओच्या माध्यमातून निर्माण झालेली मैत्री प्रत्यक्ष जीवनातही माणुसकीचे नाते जपणारी ठरली. हा उपक्रम केवळ रेडिओपुरता मर्यादित न राहता एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून जाण्याचा सामाजिक संकल्प ठरला.
कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच कुमार शिंदे यांनी केली, तर ज्येष्ठ रेडिओ मित्र भोसले साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ रेडिओप्रेमी, मान्यवर, महिला भगिनी आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले रेडिओ मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त अशाच प्रकारे रेशमी मैत्रीच्या बंधनात बांधून रेडिओ मित्र मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा दुर्गे साहेब यांनी केली. या घोषणेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रेडिओच्या माध्यमातून जुळलेली मने, मैत्रीच्या धाग्याने जोडलेली नाती आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याचा संकल्प! अशा भावपूर्ण वातावरणात दारफळ येथील रेडिओ मित्र मेळावा अविस्मरणीय ठरला.
दिनप्रभा न्यूज प्रतिनिधी : श्री. अशोक शिंदे
माढा तालुका प्रमुख
दिनांक : १३ नोव्हेंबर २०२६




