मनीष देशमुख विरुद्ध अमोल शिंदे! सोलापूर DCC बँक निवडणुकीत रंगणार प्रतिष्ठेची लढत

सोलापूर DCC बँक निवडणुकीत नवा राजकीय सामना! मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांच्यात थेट लढत
नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघात दोन्ही पॅनलची प्रतिष्ठा पणाला; युवा नेतृत्वाच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
सोलापूर (दिनप्रभा प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या मतदारसंघात भाजपच्या ‘सहकार विकास पॅनल’चे मनीष देशमुख आणि मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल’चे अमोल शिंदे यांच्यात थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
देशमुख आणि शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक
भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे आक्रमक नेते आणि महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे हे या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय सहकार राजकारणात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
भाजप विरुद्ध मोहिते-पाटील समर्थकांची प्रतिष्ठा पणाला
या मतदारसंघात भाजपच्या सहकार विकास पॅनलने मनीष देशमुख यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून आपली ताकद पणाला लावली आहे. तर मोहिते-पाटील गटाने अमोल शिंदे यांना संधी देत या निवडणुकीत वेगळे राजकीय समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित न राहता दोन्ही पॅनलच्या राजकीय प्रभावाची चाचणी ठरण्याची शक्यता आहे.
मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने?
नागरी बँका आणि पतसंस्था मतदारसंघातील मतदारांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या पातळीवर मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीची रणनीती आखली जात असल्याने प्रचाराला वेग येण्याची चिन्हे आहेत. अनुभवी राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा आणि युवा चेहऱ्यांची ताकद या जोरावर दोन्ही उमेदवार विजयासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांच्यातील ही लढत निकालाच्या दृष्टीने कोणते वळण घेते, याची उत्सुकता आता वाढली आहे.
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य, समाज, संस्कार




