जिल्हा बँकबातमीमहाराष्ट्र राजकारणमाळशिरससोलापूरस्थानिक बातमी

DCC बँक निवडणुकीत मोहिते-पाटलांची पडद्यामागून मोठी खेळी! उमेदवारी अर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा होणार?

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कायदेशीर पातळीवर महत्त्वाची खेळी केल्याचे समोर आले आहे. सहकार कायदा कलम ८८ अंतर्गत झालेल्या कारवाईविरोधातील अपिलावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी त्यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे लेखी मागणी केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी मोहिते-पाटील यांनी सहकारमंत्र्यांना पत्र दिले होते. या पत्राची पोहोच न्यायालयात सादर करण्यात आल्याने त्यांच्या वेळेत केलेल्या पाठपुराव्याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.

सहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज अपात्र

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे आणि सुरेश हसापुरे या सहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. या निर्णयाविरोधात संबंधित माजी संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली आहे.

ऑगस्टमध्ये सुनावणी पूर्ण, तरीही निर्णय प्रलंबित!

कलम ८८ अंतर्गत झालेल्या कारवाईविरोधातील अपिलाची सुनावणी सहकारमंत्र्यांकडे १२ ऑगस्ट २०२६ रोजीच पूर्ण झाली होती. या प्रकरणात दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने ६ मार्च २०२५ रोजी दिले होते. मात्र, सुनावणी पूर्ण होऊनही निर्णय प्रलंबित राहिल्याने मोहिते-पाटील यांनी २६ ऑक्टोबर रोजी सहकारमंत्र्यांना पत्र देत स्थगिती अर्जावर लवकरात लवकर आदेश देण्याची मागणी केली होती.

न्यायालयात पत्रव्यवहाराचा मुद्दा उपस्थित

नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सहकारमंत्र्यांना दिलेल्या पत्राचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्यानंतरच निर्णयाची मागणी का करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला.

यावर अपिलाची सुनावणी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण झाली होती आणि त्यानंतर महिनाभरात निर्णय अपेक्षित होता. त्यामुळे यापूर्वी स्वतंत्रपणे मागणी करण्याची आवश्यकता भासली नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. तसेच २६ ऑक्टोबर रोजीच सहकारमंत्र्यांकडे पत्र दिल्याची पोहोचही न्यायालयात सादर करण्यात आली.

१६ नोव्हेंबरच्या न्यायालयीन आदेशाकडे जिल्ह्याचे लक्ष!

सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात या याचिकेवर आदेश अपेक्षित असल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्रव्यवहाराचा न्यायालयीन निर्णयावर काय परिणाम होतो? सहा माजी संचालकांच्या अपात्रतेला दिलेले आव्हान यशस्वी ठरते का? मोहिते-पाटील यांना उमेदवारी अर्जाबाबत पुन्हा संधी मिळते का? आणि या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे न्यायालयाच्या आगामी आदेशानंतर स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिनप्रभा प्रतिनिधी
दिनप्रभा न्यूज | सत्य, समाज, संस्कार

Related Articles

Back to top button