कार्तिकी यात्रेच्या तयारीला वेग; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून पंढरपुरातील प्रमुख ठिकाणांची पाहणी

भाविकांच्या सुविधांसाठी प्रशासनाला अलर्ट; स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सुरक्षिततेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
पंढरपूर (दिनप्रभा प्रतिनिधी) : आगामी कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी शहरातील महत्त्वाच्या यात्रा स्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वाखरी पालखी तळ, सरगम चौक, चंद्रभागा नदीपात्र आणि भक्तीसागर परिसरातील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यंदा कार्तिकी शुद्ध एकादशी २१ नोव्हेंबर रोजी असून, १० ते २४ नोव्हेंबरदरम्यान कार्तिकी यात्रा पार पडणार आहे. या कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने वारकरी, दिंड्या आणि भाविक पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
चंद्रभागा वाळवंटाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष
चंद्रभागा नदीपात्र आणि घाट परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. नदीकाठावरील काटेरी झुडपे हटविणे, घाटांवरील माती आणि साचलेला कचरा साफ करणे तसेच संपूर्ण घाट परिसर स्वच्छ धुण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. नदीपात्रात वाहनांची अनधिकृत ये-जा रोखण्यासाठी योग्य बंदोबस्त करण्याबरोबरच वाळवंटात खाद्यपदार्थ व माळा विक्रेत्यांकडून अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्यासही सांगण्यात आले.

भक्तीसागर परिसरातील वारकऱ्यांसाठी सुविधा
भक्तीसागर परिसरात मुक्कामी राहणाऱ्या दिंड्या आणि वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नदीपात्रात जाण्या-येण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या घाटाचे मुरुमीकरण आणि सपाटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
वाखरी पालखी तळावर पशुवैद्यकीय सुविधा
कार्तिकी यात्रेदरम्यान वाखरी पालखी तळावर जनावरांचा मोठा बाजार भरत असल्याने पशुपालक आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जनावरांना आवश्यक उपचार मिळावेत, यासाठी चोवीस तास पशुवैद्यकीय पथक उपलब्ध ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सरगम चौकातील वाहतूक कोंडी रोखण्याचे आव्हान
सरगम चौक परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे सुरू असल्याने यात्रा काळात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक पर्यायी उपाययोजना कराव्यात आणि भाविकांसह स्थानिक नागरिकांची वाहतूक सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या सुविधांसाठी नगराध्यक्षांची सूचना
या पाहणीदरम्यान नगराध्यक्षा प्रणिती भालके यांनी चंद्रभागा वाळवंटात महिला भाविकांसाठी कपडे बदलण्याच्या खोल्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसरात नियमितपणे जंतुनाशक फवारणी करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केली.
या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रणिती भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सीताराम डुबल, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविक दाखल होणार असल्याने प्रशासनासमोर स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतुकीचे मोठे आव्हान आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर आता संबंधित विभाग प्रत्यक्षात किती वेगाने कामे पूर्ण करतात, याकडे भाविक आणि पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.
दिनप्रभा न्यूज | सत्य, समाज, संस्कार




