ग्रामीण महाराष्ट्रमहाराष्ट्र राजकारणराजकीयशेतकरीसोलापूरस्थानिक बातमी

नवे कपडे, फराळाची मेजवानी अन् कष्टकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद! जयकुमार गोरेंचा अनोखा दिवाळी उपक्रम; सफाई कामगार, शेतकरी आणि ऊसतोड मजुरांमध्ये रमले!

सोलापूर दिनप्रभा प्रतिनिधी : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! मात्र हा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील कष्टकरी घटकांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. सफाई कामगार भगिनी-बंधू, शेतकरी कुटुंबीय आणि ऊसतोड कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला.

दिवाळीच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील सफाई कामगार भगिनी-बंधूंसोबत त्यांनी फराळाचा आनंद घेतला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांना भाऊबीजेची आणि दिवाळीची भेट देत त्यांचा सन्मान केला. नव्या कपड्यांची भेट, फराळाची मेजवानी आणि आपुलकीच्या संवादातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुसरीकडे, दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतही शेतीची साथ न सोडणाऱ्या शेतकऱ्यांसोबतही गोरे यांनी दिवाळी साजरी केली. दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे येथे शेतकरी माने कुटुंबीयांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबासोबत फराळाचा आनंद घेतला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मदतीचे वितरण सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

म्हैसाळ सिंचन योजना आणि २४ गाव पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी २४ तास सुरू राहणारी हेल्पलाइन सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यासोबतच दुष्काळाच्या झळा सहन करत कष्टाची वाट न सोडणाऱ्या ऊसतोड कामगार बांधवांसोबतही जयकुमार गोरे यांनी दिवाळीचा आनंद वाटून घेतला. ऊसतोड कामगारांशी आस्थेने संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीचा आधार देण्याचा प्रयत्न केला.

लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विकासकामेच नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपुलकी पोहोचवणेही महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सफाई कामगारांचा सन्मान, शेतकरी कुटुंबीयांसोबतचा संवाद आणि ऊसतोड कामगारांसोबतची दिवाळी यामुळे जयकुमार गोरेंचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे.

यावेळी आमदार समाधान आवताडे, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दिनप्रभा प्रतिनिधी

Related Articles

Back to top button