अक्कलकोटमहाराष्ट्र राजकारणराजकीयसोलापूरस्थानिक बातमी

अक्कलकोटच्या राजकारणात मेव्हणे टार्गेट! म्हेत्रेंचा कल्याणशेट्टींना टोला; आमदारांचेही जोरदार प्रत्युत्तर

अक्कलकोट दिनप्रभा प्रतिनिधी (चंद्रकांत डांगे) : यंदाची दिवाळी सोलापूरच्या राजकीय वर्तुळात फटाक्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनीच अधिक गाजत आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमधून कधी लांडगा, कधी गाढव तर कधी कुत्र्याचा उल्लेख झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा रंगली आहे. आता या शाब्दिक युद्धात अक्कलकोटची भर पडली असून, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात मेव्हण्यांवरून नवा वाद उफाळला आहे.

सोलापूरच्या राजकारणात काही दिवसांपासून प्राण्यांच्या उपमांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वक्तव्यातून ‘लबाड लांडगा’ हा शब्द चर्चेत आला. त्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनीही त्यावर प्रत्युत्तर देत राजकीय वातावरण तापवले. पुढे गाढवाच्या उपमेवरून वाद वाढला. चेतन भाऊंनी तर दोन जिवंत गाढवे आणून राजकीय टोलेबाजीला वेगळेच वळण दिले. त्यानंतर कुत्र्याच्या उल्लेखामुळेही राजकीय वातावरण ढवळून निघाले.

हे प्रकरण शांत होत नाही तोच अक्कलकोटमध्ये आता वैयक्तिक नातेसंबंधांचा उल्लेख करत राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एकेरी भाषेचा वापर करत केलेल्या विधानामुळे आधीच राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर त्यांनी अक्कलकोटमधील विकासकामे आणि कथित टक्केवारीच्या मुद्द्यावरून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लक्ष्य केले.

विकासकामांची कंत्राटे कोणाला मिळतात, असा सवाल उपस्थित करत म्हेत्रे यांनी ती कंत्राटे आमदारांच्या मेव्हण्याला मिळत असल्याचा आरोप केला. ‘बायकोचा भाऊ…’ असा उल्लेख करत त्यांनी कल्याणशेट्टी यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे अक्कलकोटच्या राजकारणात मेव्हण्याचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

मात्र, म्हेत्रेंच्या या टीकेला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही आक्रमक शब्दांत उत्तर दिले. म्हेत्रे यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत टक्केवारी आणि दोन नंबरचे धंदे केल्याचा आरोप करत, त्यांच्या प्रमाणपत्राची आपल्याला गरज नसल्याचे कल्याणशेट्टी म्हणाले.

इतकेच नव्हे तर म्हेत्रे यांच्या मेव्हण्याचा उल्लेख करत त्यांनीही पलटवार केला. स्वतःच्या मेव्हण्याने गुटखा खाऊन दारात येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पैसे मागितल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्यांच्या कुटुंबीयांवर बोलताना आधी स्वतःच्या घराकडे पाहावे, असा टोला लगावत त्यांनी म्हेत्रेंना प्रत्युत्तर दिले.

एकीकडे लांडगा, गाढव आणि कुत्र्यावरून राजकीय टोलेबाजी, तर दुसरीकडे मेव्हण्यांवरून वैयक्तिक आरोपांची फैर! सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा नेत्यांमधील शाब्दिक युद्धच अधिक चर्चेत येत असल्याचे चित्र आहे. आता अक्कलकोटमधील या नव्या वादाला पुढे कोणते वळण मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अक्कलकोट प्रभाग प्रतिनिधी : श्री. चंद्रकांत डांगे
दिनप्रभा न्यूज पोर्टल

Related Articles

Back to top button