राहुल गांधींचा ‘सत्याग्रह’ उपक्रम; देशभरातील संघर्षांच्या कथा एका नकाशावर

दिनप्रभा न्यूज पोर्टल | नवी दिल्ली
देशभरातील विविध प्रश्नांवर आणि हक्कांसाठी सुरू असलेल्या संघर्षांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ नावाचे डिजिटल व्यासपीठ सुरू केले आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सोशल मीडियावरून या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये Gen Z, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, दलित आणि महिला यांच्यासह विविध घटकांच्या संघर्षांचा उल्लेख केला. अनेकजण आपल्या हक्कांसाठी लढत असतात; मात्र त्यांचा आवाज अनेकदा एकटाच राहतो, असे त्यांनी म्हटले आहे. अशा विविध आवाजांना एका नकाशावर एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘सत्याग्रह’च्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अन्याय किंवा एखाद्या प्रश्नाविरोधात संघर्ष करणाऱ्या नागरिकांना आपली कथा, समस्या किंवा आंदोलनाची माहिती शेअर करता येणार आहे. या माहितीच्या माध्यमातून देशभरातील विविध संघर्ष एकाच ठिकाणी दिसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ देत सत्य हे मोठे शस्त्र असल्याचे म्हटले. मात्र सत्याच्या बाजूने एकत्र उभे राहण्याची ताकद त्याहून मोठी असल्याचा संदेश त्यांनी दिला.
या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या मुद्द्यांवर संसदेत, रस्त्यावर तसेच पत्रांद्वारे आवाज उठवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नागरिकांना आपली संघर्षकथा या उपक्रमाशी जोडण्यासाठी rahulgandhi.in/satyagraha या संकेतस्थळाचा संदर्भ देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘सत्याग्रह’ या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक प्रश्न आणि नागरिकांच्या संघर्षांना एकत्रित व्यासपीठ मिळते का, याकडे आता लक्ष लागले आहे.




