आंदोलननिवडणूक आयोग (election commission )महाराष्ट्र राजकारणराजकीयसोलापूरस्थानिक बातमी

संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाची सोलापुरात भव्य पदयात्रा!

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’चा जयघोष; हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

सोलापूर | दिनांक ४ नोव्हेंबर २०२६

सोलापूर : संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर शहरात बुधवारी ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषणेखाली भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत हजारो भाजप कार्यकर्ते, महिला, युवक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीका करत संविधान बदलून देशातील लोकशाही धोक्यात आणण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप केला.

पदयात्रेची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली. हजारो तिरंगा आणि भाजपचे झेंडे हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला. बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती मार्ग असा प्रवास करत पदयात्रेची सांगता महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

विरोधकांकडून खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आणि लोकशाही व्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न काँग्रेस, कम्युनिस्ट आणि विरोधी पक्षांकडून केला जात आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि अन्य घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने भाजपाला लोकशाहीचे धडे देऊ नयेत, अशी टीकाही त्यांनी केली.

एसआयआर आणि मतदार यादीवरून विरोधकांवर निशाणा

मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेवरूनही गोरे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मतदार यादीतील मृत, स्थलांतरित आणि कथित बोगस नावे हटविण्याच्या प्रक्रियेला विरोधकांकडून विरोध होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ईव्हीएमच्या मुद्द्यावरही विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सांगत, निवडणुकीत विजय मिळाला की ईव्हीएम योग्य आणि पराभव झाला की ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जातात, अशी टीका त्यांनी केली.

विकासकामांना विरोध केल्याचा आरोप

पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर पाणीपुरवठा योजना, शक्तिपीठ महामार्ग आणि उजनी जलाशय परिसरातील एआय डेटा सेंटर प्रकल्प अशा विकासकामांना विरोधकांकडून विनाकारण विरोध होत असल्याचा आरोपही पालकमंत्र्यांनी केला. जंतर-मंतरवर आंदोलन करण्यापेक्षा काँग्रेसने जनतेमध्ये जाऊन आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

व्यापाऱ्यांकडून पुष्पवृष्टीने स्वागत

पदयात्रेच्या मार्गावर विविध व्यापाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत केले. सहभागी कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सहभागामुळे पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, दीपक साळुंखे, राजन पाटील, राम सातपुते, प्रशांत परिचारक, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर शहरात निघालेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून भाजपने लोकशाही आणि संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांविरोधात जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. हजारो नागरिकांच्या सहभागामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसून आले.

दिनप्रभा प्रतिनिधी

Related Articles

Back to top button