कोल्हापूरगोकुळ दुध संघपत्रकारितामहाराष्ट्र राजकारणराजकीयसहकार

गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी थांबवा! दूध उत्पादकांच्या न्यायासाठी सतेज पाटील यांचे पत्रकारांना भावनिक आवाहन

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला निर्माण झालेल्या अडथळ्यांवरून काँग्रेस नेते तथा आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला कौल डावलून गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व संपादक आणि पत्रकारांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

यासंदर्भात ४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी राज्यातील सर्व संपादक आणि पत्रकारांना पत्र पाठवून गोकुळमधील घडामोडींवर आवाज उठवण्याची विनंती केली आहे.

साडेपाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलल्याचा आरोप

पत्रात सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी २३ जागांवर महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक गैरहजर राहिले. त्यामुळे गणपूर्ती न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली.

ही केवळ तांत्रिक बाब नसून निवडणुकीत जनतेने दिलेला कौल रोखण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सहकाराच्या मूळ तत्त्वांनाच हरताळ?

महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही शेतकरी हा संस्थेचा खरा मालक असावा, या विचारावर उभी राहिली आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची निःस्वार्थ सेवा, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नियोजन आणि वैकुंठभाई मेहता यांची नैतिक शिस्त यामुळे महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची मजबूत पायाभरणी झाली. मात्र आज गोकुळच्या माध्यमातून सहकाराच्या याच गाभ्याला धक्का दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तांत्रिक कारणांमुळे जनतेचा कौल रोखला जात असेल, तर मतदानाचा अर्थ काय उरतो? बहुमतासाठी कायद्यात बदल करण्याची किंवा शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संस्थेवर नियंत्रण मिळवण्याची चर्चा होत असेल, तर ती सहकाराच्या लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी

गोकुळमध्ये आज जे घडत आहे, ते उद्या महाराष्ट्रातील कोणत्याही सहकारी संस्थेत घडू शकते. त्यामुळे केवळ गोकुळपुरता हा विषय मर्यादित नसून महाराष्ट्रातील सहकाराचा वारसा आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा हा प्रश्न आहे.

विरोधी संचालकांनी शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बनून पत्रकारांनी सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी. सहकाराचा वारसा जपण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका बजावावी, अशी कळकळीची विनंती आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा पेच आता कसा सुटणार आणि पुढील सभेत काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दिनप्रभा प्रतिनिधी
(कोल्हापूर विभागीय कार्यकारी संपादक : श्री. डॉ. सतीश दाभाडे)

Related Articles

Back to top button