डोंबिवली एमआयडीसी परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा! दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नागरिकांच्या पाणी समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, अनियमित पाणीपुरवठ्यानंतर आता दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
रविवारी अनेक सोसायट्यांमध्ये नळाला आलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने तसेच त्याचा रंग बदलल्याने हे पाणी वापरण्याबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका परिसरात बारवी धरणातून पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. या जलवाहिनीतून अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, ठाणे महानगरपालिका तसेच एमआयडीसी क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलवाहिनी फुटल्याचा परिणाम संबंधित परिसरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, डोंबिवली एमआयडीसी परिसरात दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून त्याची गुणवत्ता स्पष्ट करावी, दूषित पाणीपुरवठ्याचे नेमके कारण शोधावे आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी (श्री. महेश घाडगे
डोंबिवली पूर्व)




