कृषी बातमीदुष्काळप्रशासनमहाराष्ट्रशेतकरीशेतीस्थानिक बातमी

अखेर दुष्काळी भागाची पाहणी सुरू; कटफळमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला पीक नुकसानीचा आढावा

सांगोला | प्रतिनिधी



सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यातील कटफळ येथे दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि पीक नुकसानीची माहिती जाणून घेतली.

दुष्काळामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पीक नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या.

पंचनामे पूर्ण होईपर्यंत नुकसानग्रस्त पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. नुकसानग्रस्त एकही पीक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, चारा तसेच इतर आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा आणि मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आणि नुकसानीची माहिती पालकमंत्र्यांसमोर मांडली. प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

दिनप्रभा न्यूज | सत्य, समाज, संस्कार

Related Articles

Back to top button