गर्जना मोर्चात राज ठाकरेंची आक्रमक भूमिका; “SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या”

मुंबई दिनप्रभा प्रतिनिधी : SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेच्या विरोधात तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरून आक्रमक भूमिका मांडत SIR रद्द करण्याची मागणी केली.
“SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,” अशी स्पष्ट मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास कायम राहण्यासाठी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या मतवाढीवरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. मागील निवडणुकांच्या तुलनेत भाजपची मते मोठ्या प्रमाणात कशी वाढली, याबाबत त्यांनी सवाल उपस्थित करत निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली.
दरम्यान, SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदार यादीतील बदल, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणुकीतील पारदर्शकता या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे.
मुंबईतील गर्जना मोर्चातून राज ठाकरे यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे आगामी काळात SIR आणि बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिनप्रभा न्यूज पोर्टल — सत्य, समाज, संस्कार




