शेतकरीसांगली

बहादूरवाडी–कोरेगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


बहादूरवाडी | दिनप्रभा प्रतिनिधी


वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी ते कोरेगाव रस्त्यालगत मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या वाळलेल्या गवताच्या झुडपांमध्ये बिबट्या दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे.


विशेष म्हणजे, बहादूरवाडी आणि कोरेगाव या दोन्ही गावांच्या नागरी वस्तीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी शेतीची कामे, पिकांची पाहणी किंवा इतर कारणांसाठी शेताकडे जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गावालगत बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाताना एकट्याने न जाणे, सतर्क राहणे आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती देणे आवश्यक आहे.


दरम्यान, या परिसरात बिबट्याचा वावर नेमका किती क्षेत्रात आहे, तसेच वन विभागाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाणार आहे, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.


दिनप्रभा कोल्हापूर विभागीय संपादक — श्री. डॉ. सतिश दाभाडे

Related Articles

Back to top button