
सांगोला | प्रतिनिधी | दिनप्रभा न्यूज पोर्टल
सांगोला येथील श्री राम गणेशोत्सव मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीने श्री गणरायाच्या विसर्जनाची भव्य-दिव्य मिरवणूक उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पारंपरिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी सजलेल्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
मिरवणुकीत मर्दानी खेळ, वारकरी पाऊली दिंडी, लेझीम, पखवाज सोलो, गणेश गीत यांसह विविध आकर्षक कार्यक्रम सादर करण्यात आले. पारंपरिक कला आणि भक्तीचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी सादर करण्यात आलेले विशेष देखावे श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था व ज्ञानबोध गुरुकुल, पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी साकारले. संस्थेचे अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री कौस्तुभ भोसेकर तसेच सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर मिलाफ असलेली ही विसर्जन मिरवणूक सांगोल्यातील गणेशोत्सवाची अविस्मरणीय आठवण ठरली





