सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड!

आफताब शेख सरचिटणीस, विजय गायकवाड खजिनदार; २०२६–२७ ची नूतन कार्यकारिणी जाहीर
सोलापूर | दिनप्रभा प्रतिनिधी
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या २०२६–२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. सरचिटणीसपदी आफताब शेख, तर खजिनदारपदी विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सोलापूरच्या पत्रकारिता क्षेत्रातून आनंद व्यक्त होत असून, नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वर्षाच्या कामकाजाचा अहवाल आणि आर्थिक जमाखर्च सादर करण्यात आला. त्यानंतर नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. पत्रकारांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि पत्रकार संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेणे, यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदाधिकारी व कार्यकारिणी
अध्यक्ष: विक्रम खेलबुडे
सरचिटणीस: आफताब शेख
खजिनदार: विजय गायकवाड
उपाध्यक्ष: अविनाश गायकवाड, नितीन पात्रे, अरविंद मोटे, संगमेश जेऊरे, रुपेश हेळवे.
चिटणीस: अमोल व्यवहारे, रतन (आप्पा) बनसोडे, प्रीतम पंडित, लखन अदाटे.
सहचिटणीस: धनंजय मोरे, विनोद हुमनाबादकर, रोहित थळवे.
सल्लागार: प्रशांत जोशी, शंकर जाधव, हेमंत चौधरी.
कार्यकारिणी सदस्य: विजयकुमार राजापूरे, अरुण रोटे, शीतलकुमार कांबळे, समीर कार्यकर्ते, दीपक दुपारगुडे, रवींद्र दंतकाळे, राजेश कुलकर्णी, रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, पिंटू विभुते, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, अंबादास पोळ, मुजम्मील शाहनूरकर, सुदर्शन भालेराव, सागर इप्पलपल्ली आणि आरती कुसेकर.
मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
नूतन कार्यकारिणीच्या निवडीनंतर पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा, पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासह पत्रकारांमधील एकजूट अधिक मजबूत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रात कार्य करताना पत्रकारांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकार संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरते. पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविणे, त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि पत्रकारांच्या हितासाठी विधायक उपक्रम राबविणे, या दिशेने नूतन कार्यकारिणी काम करेल, असा विश्वास पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.
विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध अध्यक्षपदी निवड होणे, हे त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. अनुभवी नेतृत्व आणि नूतन पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य अधिक व्यापक व सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री गणेश दत्तात्रय शिंदे
सोलापूर विभागीय संपादक
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य, समाज, संस्कार




