सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; सहकार न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस!

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झालेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर लगेचच या निवडीला न्यायालयीन आव्हान मिळाले असून, सहकार न्यायालयाने सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
नेमका आक्षेप काय?
राहुरी येथील बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक असताना कारखान्याने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज थकवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिलेली असल्याने संबंधित नियमांनुसार डॉ. सुजय विखे पाटील हे थकबाकीदार ठरतात, असा आक्षेप त्यांचे विरोधक तथा निवडणूक क्षेत्रातील उमेदवार एकनाथ घोगरे यांनी घेतला आहे.
याच कारणावरून घोगरे यांनी सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, तेथे अपेक्षित दाद न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.
उच्च न्यायालयानंतर सहकार न्यायालयात धाव
या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने सहकार न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर एकनाथ घोगरे यांनी अहिल्यानगर येथील सहकार न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
१६ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष!
सहकार न्यायालयाने संबंधितांना १६ नोव्हेंबर रोजी आपले म्हणणे आणि स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीत नेमकी काय भूमिका मांडली जाते आणि न्यायालय काय निर्णय देते, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांची अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे चर्चेत आली आहे. मात्र, केवळ नोटीस बजावण्यात आली म्हणून अध्यक्षपद रद्द झालेले नाही. न्यायालयाच्या पुढील आदेशानंतरच या प्रकरणाचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
आता १६ नोव्हेंबरच्या सुनावणीत काय घडणार? सुजय विखे पाटील यांचे अध्यक्षपद कायम राहणार की या निवडीसमोर नवे कायदेशीर आव्हान उभे राहणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दिनप्रभा अहिल्यानगर प्रतिनिधी




