विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळणार नवी दिशा! ‘आत्मबोध’ उपक्रमातून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन

माझा करिअर गाईड फाउंडेशनचा स्तुत्य पुढाकार; क्षमता चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख आणि भविष्याचा मार्ग ठरविण्याची संधी! विधी पळसापुरे यांचे मार्गदर्शन.
लातूर | दिनप्रभा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या क्षमता, आवडीनिवडी आणि कौशल्ये ओळखून भविष्यातील करिअरची योग्य दिशा निश्चित करता यावी, या उद्देशाने ‘माझा करिअर गाईड फाउंडेशन’च्या वतीने ‘आत्मबोध’ हा विशेष मोफत उपक्रम राबविण्यात येत आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. याच वयात विद्यार्थ्यांचा कल, आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखता आल्यास त्यांना भविष्यात योग्य शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्राची निवड करणे सोपे होते. हीच गरज ओळखून फाउंडेशनने ‘आत्मबोध’ या उपक्रमाची संकल्पना पुढे आणली आहे.
या उपक्रमांतर्गत तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेण्यात येणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांचा नेमका कल आणि त्यांच्या अंगी असलेल्या विशेष गुणांची ओळख करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी व क्षमतांनुसार भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांच्या आधारे आपल्या भविष्याचा निर्णय न घेता स्वतःमधील क्षमता आणि आवड ओळखून करिअरची निवड करावी, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित तसेच महाराष्ट्र शासनाच्या सुधारित युवा धोरण समितीवर कार्यरत असलेल्या ‘माझा करिअर गाईड फाउंडेशन’च्या संस्थापिका विधी पळसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता माहीत नसल्यामुळे करिअर निवडताना संभ्रम निर्माण होतो. अशा परिस्थितीत ‘आत्मबोध’ उपक्रम विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून देणारा आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्यासाठी दिशा दाखविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
तरी लातूरसह परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनी या मोफत उपक्रमाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७९७२८५८४५९
दिनप्रभा न्यूज
बातमी : श्री. गणेश शिंदे
सत्य, समाज, संस्कार




