गुन्हेगारीग्रामीण महाराष्ट्रमाढास्थानिक बातमी

माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे चोरट्यांचा धुमाकूळ; घरासह किराणा दुकान फोडले, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अंजनगाव उमाटे : माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरासह किराणा दुकानाला लक्ष्य केले. मध्यरात्री १२ ते २ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व मौल्यवान दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परगावी गेल्याची संधी साधून चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव उमाटे येथील श्री. चंदूबप्पा कौलगे यांच्या घरात आणि किराणा दुकानात चोरट्यांनी चोरी केली. चंद्रकांत कौलगे हे मुंबई येथे परगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घरात व दुकानात प्रवेश केला. घरातील वस्तू अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात येत आहे.

चोरट्यांनी किराणा दुकानात मद्यपान केल्याचेही समोर आले आहे. या घटनेचे काही दृश्य दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास मदत होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींबाबत ग्रामस्थांकडून संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्यक्तींची ओळख अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.

इतर घरांमध्येही चोरीचा प्रयत्न

याच परिसरातील समाधान पवार, हर्षद कोंढारे आणि वैभव कौलगे यांच्या घरांमध्येही चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, घरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना आपला डाव साधता आला नाही. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

गावात एकाच रात्री चोरी आणि चोरीच्या प्रयत्नांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी गावात गस्त वाढवावी, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घ्यावा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे अंजनगाव उमाटे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरीच्या घटनेचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दिनप्रभा प्रतिनिधी | माढा तालुका

अशोक शिंदे, दारफळ
संपर्क : ९७६६९७६२६३

Related Articles

Back to top button