पंढरपूरपदवीधर मतदार संघपुणे शिक्षक मतदार संघमहाराष्ट्र राजकारणसोलापूरस्थानिक बातमी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह विविध संघटनांचा पाठिंबा; डॉ. रोंगे यांना विजयाचा विश्वास,पहिल्या १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करणार!

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे मैदानात; अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करण्याचा संकल्प.!

तीन वर्षांत ३० हजार शिक्षकांशी थेट संपर्क; जुनी पेन्शन, अनुदान, टीईटी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह विविध संघटनांचा पाठिंबा; विक्रमी मताधिक्याने विजयाचा विश्वास…

सोलापूर | प्रतिनिधी

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत स्वेरीचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी उमेदवारी जाहीर करत शिक्षकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्वेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यात यश मिळाले. त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षकांनाही त्यांच्या प्रश्नांवर न्याय मिळावा आणि शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या स्वेरीच्या प्रगतीमुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या अपेक्षा आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक तसेच शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांच्या आग्रहामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांत ३० हजार शिक्षकांशी संपर्क

गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू असून, मागील ४० वर्षांतील आपला संपर्क आणि संघर्षात्मक प्रवास शिक्षकांनी जवळून पाहिला आहे. या तीन वर्षांच्या काळात पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमधील सुमारे ३० हजार शिक्षकांशी थेट संपर्क साधला आहे. या संपर्कातून शिक्षकांचे प्रेम आणि पाठबळ मिळाले असून, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास डॉ. रोंगे यांनी व्यक्त केला. शिक्षक मतदारसंघ ही केवळ निवडणुकीची व्यवस्था नसून शिक्षकांचे अनुभव, व्यावसायिक अडचणी आणि शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न विधिमंडळापर्यंत पोहोचविण्याची घटनात्मक संधी आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या प्रतिनिधीने प्रश्न मांडण्याबरोबरच त्यांचा धोरणात्मक पाठपुरावा करून प्रत्यक्ष उपाययोजना घडवून आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अशैक्षणिक कामांच्या ओझ्यातून शिक्षकांची मुक्तता करणार

शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी त्यांच्यावर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा संकल्प डॉ. रोंगे यांनी व्यक्त केला. विविध शासकीय पोर्टलवर माहिती भरणे, विद्यार्थ्यांचे आधार व अपार आयडी, यू-डायस नोंदी, ऑनलाइन प्रशिक्षण, विविध अभियानांचे अहवाल, शालेय उपक्रमांचे फोटो आणि लिंक अपलोड करणे, सर्वेक्षणे, विविध समित्यांचे इतिवृत्त, पोषण आहाराच्या नोंदी, शिष्यवृत्ती योजनांची माहिती, शाळेतील विविध रजिस्टर आणि ऑनलाइन-ऑफलाइन नोंदी अशा अनेक कामांमध्ये शिक्षकांचा मोठा वेळ खर्च होतो. या कामांचा सविस्तर आढावा घेऊन शिक्षकांना अनावश्यक प्रशासकीय कामांतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जुनी पेन्शन, टीईटी आणि अनुदानाचे प्रश्न केंद्रस्थानी

आपल्या संकल्पनाम्यात जुनी पेन्शन योजना व निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा, टीईटी सक्तीचा प्रश्न, टप्पा-वाढ अनुदान, पात्र शाळांना अनुदान मिळण्यात येणाऱ्या अडचणी, विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयांचे प्रश्न, नवीन संचमान्यता रद्द करण्याची मागणी, वेतनश्रेणी निश्चिती आणि वाढ, सेवाज्येष्ठता व पदोन्नती, शिक्षकांच्या बदल्यांचे पारदर्शक धोरण आणि सुलभ भरती प्रक्रिया या मुद्द्यांचा समावेश असल्याचे डॉ. रोंगे यांनी सांगितले.

याशिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, डिजिटल कामकाजातील अडचणी, निवृत्त शिक्षकांसाठी सन्मान व सहाय्य, तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील पात्र प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कालबद्ध धोरण जाहीर करावे, अशी मागणीही ते करणार आहेत. स्वयंसहायता महाविद्यालये आणि शाळांशी संबंधित प्रश्नांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

निवडून आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचा कृती आराखडा

शिक्षकांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता त्यांचा कालबद्ध पद्धतीने पाठपुरावा करण्यावर भर देणार असल्याचे डॉ. रोंगे यांनी स्पष्ट केले. निवडून आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचे, याचा कृती आराखडा तयार करून त्यानुसार काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांचा सन्मान, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक धोरणांमध्ये अनुभवी व्यक्तींचा सहभाग आणि शिक्षणव्यवस्थेतील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक यासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह विविध संघटनांचा पाठिंबा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आपल्याला पाठिंबा दिला असून, जय जोहार आदिवासी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या सांगली व कोल्हापूर शाखेकडूनही पाठिंबा मिळाल्याचे डॉ. रोंगे यांनी सांगितले. शिक्षकांच्या विविध संघटना, कर्मचारी, संस्थाचालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य मिळत असल्याचा दावा करत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळविण्याचा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाहीही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Back to top button