दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘इच्छा भगवंताची’ मंडळाचा पुढाकार; २ लाख ५१ हजारांची मदत सुपूर्द!

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रूपाभवानी मंदिरात अभिषेक व महाआरती करून शेतकरी संकटमुक्त होण्यासाठी प्रार्थना
सोलापूर | दिनप्रभा प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सोलापुरातील ‘इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळा’ने सामाजिक बांधिलकी जपत २ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने हा उपक्रम राबविला. मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
वाढदिवसाच्या खर्चाऐवजी शेतकऱ्यांना मदत
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी आणि बॅनरबाजीवर खर्च न करता संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. शुभेच्छा देण्यासाठी होणारा खर्च समाजोपयोगी कामांसाठी वापरावा आणि अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहावे, असा संदेश त्यांनी दिला होता.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘इच्छा भगवंताची’ नवरात्र महोत्सव मंडळाने २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना आधार देणारा हा उपक्रम इतर सामाजिक संस्था आणि मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक
यावेळी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंडळाने पुढाकार घेऊन आर्थिक मदत केल्याने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपाचे नगरसेवक किसन जाधव यांनीही राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीची गरज अधोरेखित केली. पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने मदतीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘इच्छा भगवंताची’ परिवाराचे संस्थापक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, नगरसेविका सौ. अंबिका नागेश अण्णा गायकवाड आणि अॅड. अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वातून हा उपक्रम राबविण्यात आला. आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला महापौर विनायकदादा कोंड्याल, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, नगरसेविका सौ. चैत्रालीताई शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रूपाभवानी देवीच्या चरणी साकडे
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, तसेच राज्यातील दुष्काळाचे संकट लवकर दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने भाजपाचे नगरसेवक किसन जाधव यांनी सोलापूरची ग्रामदैवता कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवीच्या मंदिरात अभिषेक आणि महाआरती केली. यावेळी देवीच्या चरणी प्रार्थना करून राज्यात सुख-शांती नांदावी आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमावेळी नगरसेविका सौ. चैत्रालीताई शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, श्रीकांत गिड्डे, वसंत कांबळे, माणिक कांबळे, महादेव राठोड, सागर गायकवाड, संजय राजपूत, नागराज गायकवाड, यल्लाप्पा शिवपुरे आदी उपस्थित होते.
एकीकडे धार्मिक श्रद्धा आणि दुसरीकडे सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधत ‘इच्छा भगवंताची’ नवरात्र महोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेली आर्थिक मदत लक्षवेधी ठरली आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यावे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी




