प्रा. विशाल गरड यांना ‘अटल भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार; पांगरीच्या सुपुत्राचा दिल्लीत सन्मान

- पांगरी, ता. बार्शी | दिनप्रभा प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. विशाल गरड यांना २०२६ वर्षाचा मानाचा ‘अटल भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालयात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया यांच्या हस्ते तसेच देशातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. गरड यांचा राष्ट्रीय सन्मान करण्यात आला.
या राष्ट्रीय सन्मानानंतर पांगरी येथे त्यांच्या निवासस्थानी भाजप डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रा. गरड यांचा सत्कार करण्यात आला.
दिनप्रभा प्रतिनिधीशी बोलताना डॉ. देवेंद्र डोके म्हणाले, “आमच्या पांगरी गावचे सुपुत्र प्रा. विशाल गरड यांना ‘अटल भूषण’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या, अभ्यासाच्या आणि राष्ट्रभक्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे.”
दिनप्रभा प्रतिनिधीशी बोलताना प्रा. विशाल गरड यांनी सांगितले, “दिल्ली येथे ‘अटल भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. देवेंद्र डोके यांनी पांगरी येथे माझ्या निवासस्थानी येऊन केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्या पांगरी गावचा आणि माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांचा आहे.”
यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, दिनराज धावारे, गुणवंत जाधव, अमर येडवे तसेच गरड परिवारातील सदस्य उपस्थित होते.
प्रा. विशाल गरड यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे पांगरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




