आंदोलन

गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करा; किसान संघाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

गडहिंग्लज दिनप्रभा प्रतिनिधी (कोल्हापूर ): पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महादेव मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर पोहोचला.

या मोर्चामध्ये भारतीय किसान संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात भगवे झेंडे घेत गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.

तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पावसाअभावी शेती आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना व मदत मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ आंदोलकांची गर्दी झाली होती.

दिनप्रभा न्यूज पोर्टलचे कोल्हापूर विभागीय संपादक — श्री. डॉ. सतीश दाभाडे

Related Articles

Back to top button