“शब्दांत प्रभाव असेल, तर ते थेट हृदयाला भिडतात!” — मंदार केसकर

पंढरपूरच्या अध्यापक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त व्याख्यान.
पंढरपूर : दिनप्रभा प्रतिनिधी
“लफ़्ज़ों में असर हो तो दिलों तक पहुँच जाते हैं… वरना ऊँची आवाज़ वाले भी अक्सर अनसुने रह जाते हैं…”

प्रभावी संवादाचे महत्त्व अधोरेखित करत मंदार केसकर यांनी शिक्षकांनी आपल्या वक्तृत्वातून विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचावे, असे प्रतिपादन केले. शिक्षकाचे कार्य केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला दिशा देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भावी शिक्षकांनी विषयज्ञानासोबत प्रभावी संवादकौशल्य आणि वक्तृत्व विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित ‘भावी शिक्षकांना संवादकौशल्य व वक्तृत्वाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने केलेल्या स्वागताने झाली. व्याख्यानात केसकर यांनी प्रभावी वक्तृत्वासाठी नियमित वाचन, योग्य शब्दांची निवड, आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी छात्र विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मंदार केसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील ‘आविष्कार’ या भित्तीपत्रकाच्या आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानामालक कवठेकर होते. संस्थेचे सदस्य डॉ. मिलिंद जोशी आणि एस. पी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. हणमंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मंदार केसकर यांच्या प्रभावी संवाद आणि वक्तृत्वावरील मार्गदर्शनामुळे भावी शिक्षकांना प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक कौशल्यांची दिशा मिळाली. प्राचार्य डॉ. हणमंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापकवृंद, छात्र अध्यापक आणि आयोजकांनी परिश्रम घेतले.
दिनप्रभा प्रतिनिधी




