राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचा २२ वा स्थापना दिन उत्साहात | Solapur | ICAR,तीन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे अनावरण

दिनप्रभा न्यूज पोर्टल | सत्य, समाज, संस्कार
सोलापूर | २५ सप्टेंबर २०२६
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (भा.कृ.अनु.प.) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे २२ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैज्ञानिक, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी, प्रकल्प कर्मचारी, शेतकरी प्रशिक्षणार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री. अमोलकुमार देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे होते.

संशोधन क्षेत्रातील तीन महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे अनावरण स्थापना दिनानिमित्त डाळिंब संशोधन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन प्रकाशनांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ट्यपूर्ण एकरूपता, एकसारखेपणा व स्थिरता (DUS) – वाणांचे सूचीपत्र (भाग-२)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची निर्मिती व विकास
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राची वाटचाल : राष्ट्रासाठी दोन दशकांचे डाळिंब संशोधन
ही प्रकाशने डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहेत.
शाश्वत डाळिंब उत्पादनावर भर
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजीव मराठे यांनी गेल्या २२ वर्षांतील संशोधनाची वाटचाल, विकसित तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा आढावा घेतला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हवामान-सक्षम आणि शाश्वत डाळिंब उत्पादनासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याची केंद्राची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली.
सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
प्रमुख पाहुणे श्री. अमोलकुमार देशपांडे यांनी उपस्थितांना सायबर गुन्हे, सायबर फसवणूक प्रतिबंध, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि कायदेशीर सहाय्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून उपस्थितांना डिजिटल सुरक्षिततेबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण
यावेळी “डाळिंबावरील कीड व रोगांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जैव-नियंत्रक घटकांचा प्रभावी वापर” या विषयावरील तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता गिरी यांनी केले, तर डॉ. निलेश एन. गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.




