चंद्रभागापंढरपूरवारकरी संप्रदायस्थानिक बातमी

चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेचा जागर! एकाच दिवसात २६ टन कचरा संकलित; हजारो जणांचे श्रमदान

पंढरपूर नगरपरिषदेच्या मोहिमेला सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान ८५ टन कचरा संकलित

पंढरपूर | दिनप्रभा प्रतिनिधी

श्री विठ्ठलाच्या पावन नगरीतील चंद्रभागा नदीचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंढरपूरमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकाराने आयोजित या विशेष उपक्रमात तब्बल एक हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत श्रमदान केले. या मोहिमेच्या माध्यमातून ७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ८५ टन कचरा गोळा करण्यात आला असून, आजच्या विशेष श्रमदानात तब्बल २६ टन कचरा संकलित करण्यात आला. ही माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी हजारो हात सरसावले !

चंद्रभागा वाळवंट परिसरात भाविकांकडून सोडण्यात येणारी वस्त्रे, धार्मिक साहित्य, निर्माल्य, प्लास्टिक आणि अन्य कचऱ्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. नदीपात्र आणि वाळवंट परिसरातील कचरा एकत्रित करून परिसर स्वच्छ करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या मोहिमेत पंढरपूर नगरपरिषदेसोबत इंडियन मेडिकल असोसिएशन, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, देशमुख जिम कट्टा ग्रुप, गुजराथी रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अनुलोम सामाजिक संस्था, आपटे उपलप प्रशाला, श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था आदी संघटनांनी सहभाग घेतला.

विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक अशा सुमारे एक हजार जणांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश दिला.

वारकरी महाराजांसह स्वयंसेवकांचे श्रमदान

या स्वच्छता उपक्रमात ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत, ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. ठाकूरबुवा महाराज, ह.भ.प. उखळीकर महाराज, ह.भ.प. भागवत महाराज कबीर, ह.भ.प. ज्ञानेश्वर जोगदंड महाराज, हभप रामेश्वर जाधव महाराज, दिनप्रभा न्यूज चे मुख्य संपादक हभप डॉ. किरण बोधले महाराज आणि ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष श्रमदान केले.

नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मोहिमेत योगदान दिले. समाजमाध्यमांवरून या अभियानाची माहिती मिळाल्यानंतर कल्याण येथील स्वच्छतादूत केतन वाकडे यांनीही पंढरपुरात येऊन स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.

कचरा संकलनासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चंद्रभागा नदीपात्र आणि वाळवंटातील साचलेला कचरा, प्लास्टिक तसेच धार्मिक साहित्य गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वच्छतेबरोबरच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकचा मर्यादित वापर आणि नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला.

स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराप्रती कर्तव्यभावनेतून ती जपली पाहिजे. धार्मिक श्रद्धा जपत नदीपात्रात कचरा टाकणे टाळले पाहिजे, असे आवाहन ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.

‘स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’; चंद्रभागेचे पावित्र्य जपण्याचे आवाहन

पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविक येथे येतात. चंद्रभागा नदी आणि तिच्या वाळवंटाला धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामुळे या परिसराचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे ही भाविकांसह स्थानिक नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे.

‘स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’, ‘श्रमदानातून भक्ती’ आणि ‘सहभागातून स्वच्छता’ या संकल्पनांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रत्येकाने नदीपात्रात वस्त्रे, प्लास्टिक आणि इतर कचरा टाकणे टाळून स्वच्छ पंढरपूरच्या निर्मितीस हातभार लावावा, असे ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.

दर बुधवारी सकाळी साडेसात वाजता स्वच्छता मोहीम

पंढरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात येते. आजचे श्रमदान या उपक्रमाचे चौथे आयोजन होते.

या मोहिमेत अधिकाधिक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. इच्छुक संस्थांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून सहभागाची नोंदणी करावी, असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

चंद्रभागा स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या दैनंदिन वर्तनाचा भाग बनणे आवश्यक आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच पंढरपूरची धार्मिक ओळख जपतानाच नदीचे पर्यावरणही सुरक्षित ठेवता येईल.

दिनप्रभा पंढरपूर प्रतिनिधी

सत्य समाज संस्कार

Related Articles

Back to top button