खरसोळीत शेतकरी जनजागृतीसाठी घोंगडी बैठक!राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ नोव्हेंबरला सोलापुरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा;

खरसोळी : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जनजागृती करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने खरसोळी येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत आगामी मोर्चाचे नियोजन, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग कसा वाढवता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक घोंगडी बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत एकजुटीचा संदेश देण्यात आला.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या भव्य मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने आवाज उठवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
खरसोळी येथे झालेल्या या घोंगडी बैठकीस शेतकरी संघटनेचे दीपक भोसले, सचिन पाटील, रणजित बागल, छगन पवार, शंकर पवार यांच्यासह खरसोळी गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या भव्य मोर्चात खरसोळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजूट, अन्यायाविरोधात संघर्ष आणि आपल्या मागण्यांसाठी बुलंद आवाज! असा निर्धार या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.
प्रतिनिधी : श्री. आकाश पवार (दिनप्रभा ग्रामीण प्रतिनिधी)
संपादक : श्री. डॉ. किरण दिनकर बोधले
दिनप्रभा न्यूज | सत्य, समाज, संस्कार




