बारामतीमहाराष्ट्र राजकारणराजकीयशैक्षणिक

शरद पवारांचं निमंत्रण मोदींनी स्वीकारलं! ३ नोव्हेंबरला पंतप्रधान बारामतीत; ‘प्रेरणास्थळा’चं उद्घाटन करणार

बारामती | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी बारामती दौऱ्यावर येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना बारामतीत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाला भेट देणार आहेत. विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या सुमारे ४ टन वजनाच्या पुतळ्याचे अनावरण देखील मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सकाळी सुमारे १० वाजता बारामती विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान परिसरात जाणार असून प्रेरणास्थळाला भेट, गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच परिसरातील विविध उपक्रमांची माहिती घेणार आहेत.

महापुरुषांच्या विचारांची माहिती

विद्या प्रतिष्ठान परिसरातील प्रेरणास्थळामध्ये भगवान गौतम बुद्धांसह महाराष्ट्र आणि देशाच्या सामाजिक परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या विविध महापुरुषांच्या विचारांशी संबंधित चित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

यानंतर पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी तसेच स्टार्टअपशी संबंधित विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मान्यवरांना निमंत्रण

या कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य कार्यक्रम सकाळी ११.४५ वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याच्या संभाव्य तारखांबाबत विविध माहिती समोर आली होती. मात्र, आता ३ नोव्हेंबर २०२६ ही तारीख निश्चित झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्यामुळे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या निमंत्रणावरून मोदी बारामतीत येत असल्याने या दौऱ्याला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  1. दिनप्रभा न्यूज | सत्य, समा ज, संस्कार

Related Articles

Back to top button