आरोग्यसोलापूरस्थानिक प्रशासनस्थानिक बातमी

सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर; १४ महिन्यांत ७,९१० नागरिकांना श्वानदंश,
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; महापालिकेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष

सोलापूर दिनप्रभा प्रतिनिधी :
सोलापूर शहरातील भटक्या तसेच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, मार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७,९१० नागरिकांना श्वानदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. श्वानदंश झालेल्या नागरिकांना उपचारासाठी महापालिकेच्या मदर तेरेसा पॉलीक्लिनिकमध्ये उपचार व लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
शहरातील विविध भागांत विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच सकाळच्या वेळेत मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.


नागरिकांकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा
श्वानदंशाच्या घटनांची संख्या लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
केवळ तात्पुरती कारवाई करण्याऐवजी कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे आणि संवेदनशील भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रतिबंधावर भर आवश्यक
श्वानदंश झाल्यानंतर नागरिकांनी वेळ न दवडता वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. मात्र, उपचारांसोबतच श्वानदंशाच्या घटना कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही महापालिका प्रशासनाने भर देणे गरजेचे आहे.
“श्वानदंशाच्या घटना कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोलापूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडून ठोस, प्रभावी आणि सातत्यपूर्ण कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
दिनप्रभा न्यूज पोर्टल — सत्य • समाज • संस्कार
श्री. गणेश दत्तात्रय शिंदे
सोलापूर विभागीय कार्यकारी संपादक
📱 8605767640

Related Articles

Back to top button