माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे शेतीपंपांना ८ तास वीज, चारा छावण्या अन् विठ्ठल मंदिरासाठी जयकुमार गोरेंना निवेदन!

माढा : माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, पशुपालक, भाविक आणि ऐतिहासिक वारशाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी विविध चार महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मतदारसंघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न शासनदरबारी मांडत आमदार अभिजीत पाटील यांनी त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
शेतीपंपांना दररोज आठ तास अखंडित वीजपुरवठा करा!

माढा व पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी, सीना नदी, येवती तलाव आणि सोनके तलाव परिसरातील शेतकरी सिंचनासाठी नदी व तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांना पाण्याची असलेली आवश्यकता लक्षात घेता, या भागातील शेतीपंपांना दररोज किमान आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्याची विनंतीही त्यांनी केली.
पशुधन वाचवण्यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करा!

माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हिरव्या व कोरड्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शेतकरी आणि पशुपालक आर्थिक संकटात सापडले असून पशुधन वाचवणे हे मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात तातडीने चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करण्यास मान्यता देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.
विठ्ठल मंदिरात मुखदर्शनासाठी चार ते पाच स्वतंत्र रांगा सुरू करा!

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दररोज हजारो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात. मुखदर्शनाच्या रांगेत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांची मोठी गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी तसेच पददर्शनाच्या रांगेवरील ताण कमी करण्यासाठी श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत मुखदर्शनासाठी चार ते पाच स्वतंत्र रांगा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी केली. याबाबत संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी केली.
माढा भुईकोट किल्ल्यात आधुनिक ऐतिहासिक संग्रहालय उभारण्याची मागणी!

माढा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली. या किल्ल्यामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त ऐतिहासिक संग्रहालय आणि डिजिटल माहिती केंद्र उभारण्यात यावे, यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
या संग्रहालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास, प्राचीन वस्तू आणि शस्त्रांची माहिती पर्यटकांना व नव्या पिढीला मिळू शकेल. यामुळे ऐतिहासिक वारशाचे जतन होण्याबरोबरच माढा परिसरातील पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
माढा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार अभिजीत पाटील यांचा पुढाकार!
शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा, पशुधनासाठी चारा, पंढरपूरच्या भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था आणि माढ्याच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे संवर्धन अशा चार महत्त्वाच्या विषयांवर आमदार अभिजीत पाटील यांनी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली.
मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत हे प्रश्न शासनस्तरावर मार्गी लागावेत, यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आता या मागण्यांवर शासन आणि संबंधित प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते, याकडे माढा व पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी | माढा प्रतिनिधी




