क्रिकेटक्रीडाखरसोळीग्रामीण महाराष्ट्रपंढरपूरस्थानिक बातमी

खरसोळी प्रीमियर लीग २०२६ (पर्व दुसरे) क्रिकेटचा थरार रंगणार! सहा संघांमध्ये रंगणार चुरशीची लढत; विजेत्याला ११,१११ रुपयांचे पारितोषिक

खरसोळी, ता. पंढरपूर (दिनप्रभा ग्रामीण प्रतिनिधी – श्री. आकाश पवार)

पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘खरसोळी प्रीमियर लीग २०२६’ (पर्व दुसरे) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खरसोळी स्टेडियम अर्थात ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून, सहा संघांमध्ये क्रिकेटचा चुरशीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांसाठी स्पर्धेचा प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे.

सहा संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार

या स्पर्धेत रोकडोबा क्रिकेट क्लब, अंबिका नगर क्रिकेट क्लब, सीएम क्रिकेट क्लब, वादळ क्रिकेट क्लब, पवार वस्ती क्रिकेट क्लब आणि एलीट वॉरियर्स असे एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघातील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.

चार दिवसांत १९ सामने; आयपीएलच्या धर्तीवर स्पर्धेचे नियोजन

स्पर्धेतील सामने दररोज सकाळी १० वाजता सुरू होणार असून, एकूण १९ सामने खेळविण्यात येणार आहेत. कोणत्याही संघाचे सलग सामने होणार नाहीत, याची विशेष काळजी घेऊन सामन्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

दि. ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान लीग फेरीतील सामने बॉक्स १, बॉक्स २ आणि बॉक्स ३ अशा स्वरूपात खेळविण्यात येतील. तर दि. १० नोव्हेंबर रोजी आयपीएलच्या धर्तीवर क्वालिफायर १, एलिमिनेटर, क्वालिफायर २ आणि अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी विजेतेपदासाठी रंगणारी लढत विशेष आकर्षण ठरणार आहे.

विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिके

स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाच्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.

– प्रथम पारितोषिक – ११,१११ रुपये: मा. श्री. हनुमंत भारत काळे (सुभेदार) यांच्याकडून.
– द्वितीय पारितोषिक – ७,७७७ रुपये: मा. श्री. अतुल धर्मा पवार (उपसरपंच) आणि श्री. अमर सुरेश पवार (उपसरपंच) यांच्याकडून.
– तृतीय पारितोषिक – ५,५५५ रुपये: मा. श्री. शिवराज बलभिम पाटील (पंढरपूर फार्मसी मेडिकल, पंढरपूर) यांच्याकडून.

विविध मान्यवरांचे मोलाचे सहकार्य

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध मान्यवरांनी सहकार्य केले आहे. यामध्ये ट्रॉफीचे सौजन्य श्री. प्रशांत पितांबर पवार (रोकडोबा अर्थमुहर्स), पाण्याचे सौजन्य श्री. विजयराज खासेराव पाटील आणि बॉलचे सौजन्य श्री. काकासो बाबासो ताड यांनी दिले आहे.

क्रिकेटप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

खरसोळी गावासह परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एक मोठी पर्वणी ठरणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या क्रिकेट महोत्सवात खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, तरुणांनी आणि क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनप्रभा ग्रामीण प्रतिनिधी – श्री. आकाश पवार
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य, समाज, संस्कार

Related Articles

Back to top button