आंबे येथे डेंग्यू प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पाहणी; आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन

पंढरपूर दिनप्रभा प्रतिनिधी :- दि. २ ऑक्टोबर २०२६ : प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज अंतर्गत येणाऱ्या आंबे येथे संशयित डेंग्यू रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपरवाड यांच्या नेतृत्वाखाली संशयित रुग्णाच्या घरासह आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रणाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपरवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सहसंचालक कुष्ठरोग डॉ. मोहन शेगर तसेच सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री. किरण मंजुळ उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी संशयित रुग्णाच्या घराची तसेच परिसराची पाहणी करून डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाण्याची भांडी व टाक्या झाकून ठेवाव्यात, घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये तसेच साचलेले पाणी तात्काळ वाहते करावे, असे आवाहन करण्यात आले.
‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन
डेंग्यू प्रतिबंधासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोपरवाड यांनी सांगितले. या दिवशी घरातील तसेच परिसरातील पाणी साठविणारी सर्व भांडी, टाक्या, डबे व इतर साहित्य तपासून त्यातील पाणी रिकामे करावे किंवा ते योग्य पद्धतीने झाकून ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
३३० लोकसंख्येच्या सर्वेक्षणात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली
आंबे येथे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे ३३० लोकसंख्येचा आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणात हाऊस इंडेक्स ७.२ आणि कंटेनर इंडेक्स ९.२ आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठविणाऱ्या वस्तूंची नियमित तपासणी करून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी डेंग्यूबाबत अनावश्यक भीती बाळगू नये. ताप किंवा डेंग्यूसदृश लक्षणे जाणवल्यास तातडीने शासकीय दवाखाना किंवा आरोग्य उपकेंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.
डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी तसेच ‘कोरडा दिवस’ प्रभावीपणे राबवावा, अशा सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या.
या पाहणीदरम्यान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.




