अध्यात्मकला संस्कृतीधार्मिकपंढरपूर

पंढरपुरात १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘श्री रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सव’; शास्त्रीय गायन, अभंगवाणी अन् भरतनाट्यमची मेजवानी!

पंढरपूर | दिनप्रभा प्रतिनिधी

    श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तिरसात संगीताची सुरेल अनुभूती देणाऱ्या श्री रुक्मिणी नवरात्री संगीत महोत्सवाचे आयोजन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर ते रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री संत तुकाराम भवन येथे हा महोत्सव रंगणार असून, शास्त्रीय गायन, अभंगवाणी, संत साहित्यावरील व्याख्यान आणि भरतनाट्यम नृत्य सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी संगीतप्रेमींना मिळणार आहे.

या महोत्सवात दररोज सायंकाळी ५.३० ते ७ आणि रात्री ७.३० ते १० या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत कलाकारांसह युवा गायक आणि नृत्यकलाकार आपली कला विठुरायाच्या चरणी समर्पित करणार आहेत.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवसापासून सुरेल कार्यक्रमांची मेजवानी

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी महोत्सवाचा प्रारंभ कृष्णा लवेकर यांच्या शास्त्रीय गायन व अभंग सादरीकरणाने होणार आहे. त्यानंतर ज्योती शाम गोराने यांची अभंगवाणी रसिकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी देवश्री दंडवते यांचे गायन सादर होईल. तसेच ‘आयडिया सारेगमप’ विजेती ज्ञानेश्वरी गाडगे यांच्या ‘स्वर ज्ञानेश्वरी’ या विशेष कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी प्रा. मधुकर पाटील यांचे ‘संत साहित्याची परंपरा आणि वारकरी संप्रदाय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी पं. कुमार गंधर्व यांचे नातू व शिष्य पं. भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन आणि सगुण-निर्गुण अभंग सादरीकरण होणार आहे. संत साहित्य, वारकरी परंपरा आणि अभिजात संगीत यांचा संगम या दिवसाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी रोहित पुजारी यांचे गायन होईल. त्यानंतर चैतन्य देवढे (माऊली, आळंदी) यांचा ‘स्वर चैतन्य’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

‘स्वराभिषेक’सह अभंगवाणीचे विशेष आकर्षण

शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी चैतन्य देशपांडे यांची अभंगवाणी सादर होणार आहे. त्यानंतर पं. शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय गायनासह अभंगांचा ‘स्वराभिषेक’ हा विशेष कार्यक्रम रसिकांना अनुभवता येईल.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी पं. राम विधाते आणि पं. बजरंग विधाते यांची अभंगवाणी सादर होणार असून, पं. शंकर विधाते यांच्या शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना अभिजात संगीताचा आनंद घेता येणार आहे.

भरतनाट्यमच्या सादरीकरणाने महोत्सवाची सांगता

रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता ‘नवरस नृत्यांजली’ हा भरतनाट्यम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री ७.३० वाजता लक्ष्मी बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शक्ती जागर’ या भरतनाट्यम सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी उपक्रम

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने शास्त्रीय संगीत, अभंगवाणी आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. या उपक्रमातून नामवंत कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते, तसेच विविध सांगीतिक आणि नृत्यकलांना व्यासपीठ उपलब्ध होते.

पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या महोत्सवामुळे स्थानिक नागरिकांसह पंचक्रोशीतील संगीतप्रेमींना भक्तिसंगीत आणि अभिजात कलांचा आनंद घेता येणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनप्रभा न्यूज पोर्टल व न्यूज चॅनेल
सत्य • समाज • संस्कार

Related Articles

Back to top button