पंढरपूरस्थानिक बातमी

विश्व संस्कृत दिनानिमित्त विवेक वर्धिनी विद्यालयात संस्कृत प्रदर्शन

पंढरपूर (दिनप्रभा प्रतिनिधी ): विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर येथे दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी विश्व संस्कृत दिनानिमित्त संस्कृत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाशी संबंधित विविध शैक्षणिक साहित्य, उपक्रम व कलाकृती प्रदर्शनात सादर करून संस्कृत भाषेची समृद्ध परंपरा आणि महत्त्व प्रभावीपणे मांडले.

या संस्कृत प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य श्री. डॉ. यू. आर. मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्कृत शिक्षिका सौ. शितोळे मॅडम यांच्या विशेष परिश्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेतील विविध संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रदर्शनाला शैक्षणिक आणि उत्साही वातावरण लाभले.

यावेळी उपमुख्याध्यापक श्री. पवार ए. ए., पर्यवेक्षक श्री. शिनगारे आर. डी. यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या संस्कृत प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कृत शिक्षिका सौ. शितोळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि संस्कृत विषयातील आवडीला व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम प्रशालेत उत्साहात पार पडला.

— दिनप्रभा प्रतिनिधी, पंढरपूर

Related Articles

Back to top button