मंगळवेढ्यात ४३०० शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे वाटप करण्याचा कृषी विभागाचा संकल्प; आतापर्यंत ९४३ शेतकऱ्यांना लाभ!

मंगळवेढा दिनप्रभा प्रतिनिधी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत मंगळवेढा तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील तब्बल ४३०० शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे उपलब्ध करून देण्याचा संकल्प कृषी विभागाने केला आहे.
या अभियानांतर्गत आतापर्यंत मंगळवेढा तालुक्यातील ९४३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून ज्वारीच्या बियाण्याचा लाभ घेतला आहे. मात्र, अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सौ. मनीषा मिसाळ यांनी केले आहे.
बियाणे वाटपादरम्यान बोलताना सौ. मिसाळ यांनी सांगितले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी या अभियानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. अद्याप जवळपास एक हजार शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज येणे अपेक्षित असून, पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
या बियाणे वाटप उपक्रमावेळी श्री. प्रशांत काटे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रदीप कोकरे, श्री. स्वप्निल बळछेत्रे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाच्या माध्यमातून ज्वारी पिकाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनप्रभा न्यूज | मंगळवेढा तालुका प्रतिनिधी : श्री. विक्रम यादव
—
खुलासा : या बातमीतील माहिती संबंधितांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे. काही त्रुटी किंवा चुकीची माहिती आढळल्यास योग्य पुराव्यासह संपर्क साधावा. आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल.
टीप : बातमीसोबत वापरण्यात येणारे ग्राफिक्स किंवा छायाचित्रे प्रातिनिधिक अथवा AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेली असू शकतात.




