Raj Thackeray On Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त आणि सरकारने राजीनामा द्यावा; राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

‘कणाहीन निवडणूक आयोग आणि सरकारचा राजीनामा व्हायलाच हवा’; राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला
विशेष वृत्त / दिनप्रभा न्यूज पोर्टल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निवडणूक आयुक्तांसह सरकारचा राजीनामा मागणारी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांसह सरकारने राजीनामा द्यावा
राज ठाकरे म्हणाले की, “मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हा तर व्हायलाच हवा, पण या असल्या कणाहीन निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे सरकार निवडून आले, त्या सरकारनेही राजीनामा द्यायला हवा”.
सत्ताधाऱ्यांच्या विजयावर शंका उपस्थित करताना ते म्हणाले, “आम्ही बहुमताने निवडून आलो असे सांगणाऱ्या सरकारच्या निवडीनंतर रस्त्यावर कुठेही जल्लोष दिसला नव्हता, यातच सगळे स्पष्ट होत आहे”. हेच आपण आधीपासून सांगत असल्याचे स्पष्ट करत, “जर निवडणूक आयोग अपेक्षेप्रमाणे स्वायत्त झाला तर आणि तरच सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणता येईल, हेच अंतिम सत्य आहे” असा इशाराही त्यांनी दिला.
‘ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले, आता सत्तेतले रेडे…’
दुसऱ्या एका विधानाद्वारे राज ठाकरे यांनी निशाणा साधताना म्हटले, “ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायत. असो, गेले दोन दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत”.
निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि सरकारच्या वैधतेवर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
