नवरा-नवरी ओढा परिसरात गाईवर वन्यप्राण्याचा हल्ला; शेतकऱ्यांमध्ये सतर्कतेचे आवाहन

वैराग | सर्जापूर : वैराग परिसरातील सर्जापूर येथील नवरा-नवरी ओढा परिसरात वन्यप्राण्याने गाईवर हल्ला करून ठार केल्याची घटना समोर आली आहे. भारत कोरके यांच्या मालकीची गाय या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे. घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरा-नवरी ओढा परिसरात भारत कोरके यांची गाय आढळून आली. तिच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला. घटनास्थळी गाईच्या शरीरावर जखमा तसेच रक्ताचे डाग आढळून आले आहेत.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जनावरे रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेत किंवा शेताच्या परिसरात एकटी सोडू नयेत, तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस पाटील गणेश मसाळ यांचे आवाहन
याबाबत पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमागे नेमका कोणता वन्यप्राणी आहे, याची अधिकृत माहिती संबंधित यंत्रणांच्या पाहणीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दिनप्रभा प्रतिनिधी | वैराग-सर्जापूर




