सोलापुरात शक्तिदेवीच्या मिरवणुकीत एक हजार लेझीमधारकांचा बहारदार खेळ!

आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते महापूजा व आरती; ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
सोलापूर | दिनप्रभा प्रतिनिधी
सोलापूर : इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शक्तिदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. सुमारे एक हजार लेझीमधारकांचा शिस्तबद्ध सहभाग, सोलापुरी ढोल-ताशांचा निनाद आणि ‘आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे’च्या जयघोषामुळे परिसर भक्तिमय झाला.
रेल्वे स्थानक परिसरातील गांधी पुतळ्याजवळील पोस्ट ऑफिस येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. आमदार देवेंद्र कोठे आणि अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते शक्तिदेवीची महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह आमदार कोठे आणि नगराध्यक्ष कल्याणशेट्टी यांनीही लेझीम खेळात सहभाग घेतला.
पारंपरिक लेझीम खेळाने जिंकली भाविकांची मने
पारंपरिक वेशभूषेतील युवकांनी ढोल-ताशा आणि संबळच्या तालावर लेझीमची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. तालबद्ध संचलन आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली. फुलांनी सजविलेल्या वाहनात शक्तिदेवी, सौंदत्ती येथील यल्लमादेवी, भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सजविलेल्या वाहनाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे : आमदार देवेंद्र कोठे
आमदार देवेंद्र कोठे यांनी मंडळाला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत इच्छा भगवंताची परिवाराच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. गेल्या तीस वर्षांपासून मंडळाशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगून युवकांनी पारंपरिक खेळांच्या माध्यमातून व्यसनांपासून दूर राहावे, भारतीय संस्कृतीचे जतन करावे आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (मामा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि उत्सव अध्यक्ष अंबादास पट्टप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, नगरसेवक राजशेखर पाटील, किसन (भाऊ) जाधव, अश्विनी चव्हाण, चैत्राली गायकवाड, श्रद्धा किरण पवार, स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजीखाने, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, डॉ. सुजित जागीरदार, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, सुधीर बहिरवडे, पर्यावरणप्रेमी महेश देवकर, किरण पवार, ॲड. अनिल (दादा) जाधव, शिवाजी मामा गायकवाड, सचिन अक्षय जाधव, विनोद जाधव, पवन गायकवाड आणि ॲड. संजय राठोड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीदरम्यान चेतन गायकवाड आणि कार्तिक जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत करून सन्मान केला. रात्री रामवाडी सेटलमेंट येथे शक्तिदेवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपरिक लेझीम खेळ, भक्तीमय वातावरण आणि युवकांच्या उत्साहामुळे या मिरवणुकीने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
—
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सोलापूर विभागीय संपादक : श्री. गणेश शिंदे
मोबाईल : 8605767640
सत्य, समाज, संस्कार




