अक्कलकोटग्रामीण महाराष्ट्रराजकीयस्थानिक बातमी

वक्तव्यांच्या आतषबाजीने अक्कलकोटचे राजकारण प्रदूषित! ज्येष्ठ काँग्रेस नेते अशपाक बळोरगी यांचे कल्याणशेट्टी-म्हेत्रेंसह सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

अक्कलकोट | दिनप्रभा प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध राजकीय वक्तव्ये, आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक टीकेमुळे राजकारणाचा स्तर घसरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशपाक बळोरगी यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

हयात नसलेल्या व्यक्तींविषयी टीकाटिप्पणी करू नका!

राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकीय संघर्ष करताना हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल टीकाटिप्पणी किंवा वादग्रस्त वक्तव्ये करणे योग्य नाही. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. प्रत्येकाने बोलताना शब्दांचे भान ठेवावे आणि राजकीय वादाला वैयक्तिक पातळीवर नेऊ नये, अशी भूमिका अशपाक बळोरगी यांनी मांडली आहे.

लांडगा, गाढव, कुत्र्यापासून मेव्हण्यांपर्यंत राजकीय टोलेबाजी!

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमधील शाब्दिक युद्धाला उधाण आले आहे. यंदाची दिवाळी फटाक्यांपेक्षा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनीच अधिक गाजल्याचे चित्र पाहायला मिळाले. कधी ‘लबाड लांडगा’, कधी गाढव तर कधी कुत्र्याच्या उल्लेखावरून राजकीय टोलेबाजी रंगली. त्यातच अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात विकासकामे, कथित टक्केवारी आणि कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले.

या वादात दोन्ही नेत्यांकडून एकमेकांच्या मेव्हण्यांचा उल्लेख करत वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात आली. विकासकामांची कंत्राटे आमदारांच्या मेव्हण्याला मिळत असल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला. त्याला उत्तर देताना आमदार कल्याणशेट्टी यांनीही म्हेत्रे यांच्या मेव्हण्याचा उल्लेख करत जोरदार पलटवार केला. त्यामुळे अक्कलकोटच्या राजकारणात मेव्हण्यांचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

एकीकडे विकासकामे आणि कथित टक्केवारीवरून आरोप-प्रत्यारोप, तर दुसरीकडे वैयक्तिक नातेसंबंधांचा उल्लेख करून केली जाणारी टीका, यामुळे राजकीय संघर्षाची मर्यादा ओलांडली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकासाचे प्रश्न बाजूला पडून वैयक्तिक टीका आणि नातेसंबंधांवरील वक्तव्यांना महत्त्व मिळत असल्याने अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण प्रदूषित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नवोदित युवकांमध्ये संभ्रम; राजकारणाचा आदर्श काय?

राजकारणात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या युवकांवर अशा वक्तव्यांचा विपरीत परिणाम होत आहे. समाजसेवा, विकासकामे आणि लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी वैयक्तिक टीका आणि आरोप-प्रत्यारोपांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे राजकारणात येणाऱ्या नवोदित युवकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची खंतही बळोरगी यांनी व्यक्त केली.

राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनी वैचारिक मतभेद जरूर मांडावेत; मात्र व्यक्तीचा सन्मान, सामाजिक सलोखा आणि राजकीय संस्कृती जपली पाहिजे. राजकारण हे विकासाच्या मुद्द्यांवर व्हावे, वक्तव्यांच्या आतषबाजीने ते प्रदूषित होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आता ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी यांच्या या आवाहनाला आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि सर्वपक्षीय नेते कोणता प्रतिसाद देतात, याकडे अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दिनप्रभा अक्कलकोट तालुका प्रतिनिधी श्री. चंद्रकांत डांगे

Related Articles

Back to top button