अक्कलकोटच्या सांगवी वॉटर वर्क्स परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळणार?

१५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन, अन्यथा आसूड मोर्चा!
अक्कलकोट : सांगवी वॉटर वर्क्स परिसरातील सर्व शेतीपंपांना कायमस्वरूपी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी पुढील १० ते १५ दिवसांत दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सहाय्यक अभियंता श्री. आडम यांनी दिले. त्यामुळे उद्या होणारे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यावेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबरच सायंकाळी सिंगल फेज वीजपुरवठा ६.३० वाजता सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले. सायंकाळी ठरलेल्या वेळेत वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर प्रथम रोटे साहेबांना फोन करा आणि त्यानंतर मला संपर्क साधा, असे सहाय्यक अभियंता श्री. आडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
कोळेकरवाडी नं. २ परिसरात वीजपुरवठ्याचा लपंडाव!
कोळेकरवाडी नं. २ अंतर्गत येणाऱ्या दरी वस्ती, खरात वस्ती तसेच परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वीज कधी येते आणि कधी जाते, याचा कोणताही नेम नसल्याने शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. वीज आल्यानंतरच वीज आल्याचे आणि गेल्यानंतरच वीज गेल्याचे समजते, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या भागातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येकडे संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. आधीच दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी मोठी धडपड करावी लागत असताना अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एकीकडे दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे विद्युत विभागाच्या अनियमित कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
१५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आसूड मोर्चा!
सहाय्यक अभियंता श्री. आडम यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील १५ दिवसांत दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करून वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा परिसरातील शेतकरी एकत्र येऊन ‘आसूड मोर्चा’ काढतील, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनावेळी दरी वस्ती, खरात वस्ती आणि कोळेकरवाडी नं. २ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये खरात, अल्लाउद्दीन मुल्ला यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा सहभाग होता.
आता विद्युत विभागाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात किती दिवसांत पूर्ण होते आणि शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा मिळतो का, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट तालुका प्रतिनिधी : श्री. चंद्रकांत डांगे
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य, समाज, संस्कार




