पंढरपूरशैक्षणिकस्थानिक बातमी

सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिरात मराठी अभिजात भाषा गौरव दिन उत्साहात साजरा


इंद्रजीत घुले यांच्या मार्गदर्शनातून मराठी साहित्यपरंपरा आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित

सुस्ते, ता. पंढरपूर : श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते येथे मराठी अभिजात भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून मराठी भाषेचा इतिहास, समृद्ध साहित्यपरंपरा आणि तिच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. म्हेत्रे मॅडम यांच्या सूत्रसंचालनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. खिलारे सर यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला, तर श्री. गावडे सर यांनी त्यास अनुमोदन दिले. श्री. पंडित सर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री. गायकवाड सर यांनी करून दिले.

यावेळी सौ. जावीर मॅडम यांनी शिक्षक मनोगतातून मराठी भाषेचा इतिहास, तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि भाषासंवर्धनाची गरज विशद केली.

प्रमुख पाहुणे श्री. इंद्रजीत घुले यांनी आपल्या मनोगतात मराठीतील विविध कवी आणि लेखकांच्या साहित्यकृतींचे दाखले देत भाषेची समृद्ध परंपरा उलगडली. तसेच वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांच्या ‘लग्नातलं जेवण’ या कवितेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कटकधोंड यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यासोबतच दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.

मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख असून तिचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. मराठी साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. चंदनशिवे सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषेचा गौरव आणि तिच्या संवर्धनाविषयी जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Back to top button